विधान परिषद राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी खेळाडू कोट्यातून पै. काकासाहेब पवार यांच्या नावाचा विचार करावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र विधान परिषद राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी खेळाडू कोट्यातून कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार यांच्या नावाचा विचार करुन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदराव पवार यांनी संधी द्यावी, त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी केली आहे. 

पै. काकासाहेब पवार यांनी नुकतीच खा. शरदराव पवार यांची रोहा जि. रायगड येथे भेट घेऊन आपल्या समर्थकांची विशेषतः कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल व कुस्ती शौकिनांची मागणी त्यांच्या निदर्शनास आणून देत, आपल्याला संधी देण्याची विनंती त्यांच्याकडे केली, त्यावेळी पै. काकासाहेब पवार यांच्यासमवेत महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, आशियाई सुवर्णपदक विजेते पै. रवींद्र पाटील उपस्थित होते.

पै. काकासाहेब पवार यांचे सारखे कुस्ती क्षेत्राला वाहुन घेतलेले व्यक्तीमत्व विधान परिषदेत पोहोचल्यास तेथे क्रीडा क्षेत्राचे, विशेषतः कुस्ती क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना कुस्तीसह विविध खेळांच्या व खेळाडूंच्या समस्या शासन दरबारी मांडून या क्षेत्राला न्याय देतील. कुस्ती क्षेत्रात ग्रामीण खेळाडू वंचीत असेल तर त्या खेळाला व खेळाडूंना न्याय देण्याचे दरवाजे खुले होतील अशी अपेक्षा व्यक्त केली असून खा. शरदराव पवार हे पै. काकासाहेब पवार यांचा नावाचा जरुर विचार करतील व राज्यपाल नियुक्त खेळाडू कोट्यातून आमदार म्हणून त्यांना संधी देतील अशी आशा असल्याचे सांगितले जात आहे.

महाष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात पै. काकासाहेब पवार हे नाव सर्व परिचीत असून गोकुळ वस्ताद तालीम कोल्हापूर येथील हरिश्चंद्र बिराजदार यांच्या तालमीत व मार्गदर्शनाखाली कुस्ती स्पर्धेत एशियाड स्पर्धा खेळले आहेत. राष्ट्रकुल सारख्या स्पर्धा पै. काकासाहेब पवार यांनी गाजविली आहे.  ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात भारत देशाला पै. पवार यांनी तब्बल ३२ पदके मिळवून देऊन इतिहास रचला आहे. महाराष्ट्रातील १००/१५० किलो वजन व सहा सव्वा सहा फूट उंची असणाऱ्या व्यक्तीला पैलवान म्हणावे अशी प्रथा होती त्या महाराष्ट्र राज्यात ५०/५५ वजन असलेला पैलवानही निर्माण होऊ शकतो व देशाचा झेंडा साता समुद्रापार फडकवू शकतो असा इतिहास पै. काकासाहेब पवार यांनी महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात रचला आहे. 

पै. काकासाहेब पवार यांच्या कुस्ती क्षेत्रातील कारकिर्दीचा केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे. कुस्ती खेळातून निवृत्ती घेतले नंतर पै. काकासाहेब पवार यांनी पुणे येथील कात्रज (जांभुळवाडी) परिसरात स्वतःच्या मालकीचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल नावाने तालीम सुरु केली व आपल्या गुरुंनी दिलेले ज्ञान पुढील पिढीला देण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले आहे. 

पै. काकासाहेब पवार यांचे शिष्य राहुल आवारे, विक्रम कुऱ्हाडे हे जागतीक दर्जाचे मल्ल कुस्ती क्षेत्राला मिळाले असून आतापर्यंत त्यांच्या १५ शिष्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. राहुल आवारे सध्या पोलीस उप अधीक्षक क्लास वन पदावर नोकरी करीत असून किमान ५० ते ६० पैलवानांना केंद्र सरकारचे रेल्वे खात्यामध्ये मानाची नोकरी कुस्ती खेळातून मिळाली असून तेथे कार्यरत आहेत. 

मैदानी कुस्तीमध्ये किरण भगत सारखा मल्ल त्यांनी घडविला असून यावर्षी महाराष्ट्र केसरी व उप महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेले दोन्ही मल्ल त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. नाशिक येथील हर्षल सदगीर सध्या महाराष्ट्र केसरी असून शैलेश शेळके याने उप महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला आहे. 

पै. काकासाहेब पवार यांनी कुस्ती क्षेत्राला महाराष्ट्र राज्यातून खेळाडू निर्माण करता येतील तेवढे प्रयत्न सुरु ठेवले असून पै. पवार यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल कोट्यातून खेळाडू आमदार म्हणून नियुक्त केले गेले तर कुस्ती क्षेत्रात खेळाडूंना  येणाऱ्या अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जावून कुस्ती पासून वंचीत असणारे खेळाला न्याय मिळवून देण्याचे दरवाजे खुले होतील अशी मागणी करण्यात आली आहे. 

लातूर जिल्ह्यातील साई या छोट्या खेड्यात दि. ३ ऑक्टोबर १९७० रोजी पै. काकासाहेब पवार यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला, लातूर हा दुष्काळी जिल्हा, येथे पाण्याचा दुष्काळ आहे, मात्र नर रत्नांची येथे बिलकुल वाणवा नाही, कुस्तीसह अन्य विविध क्षेत्रात येथे अनेक नामवंत जन्माला आले आहेत. लातूर जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण कुस्ती क्षेत्राला अनेक  दैदिप्यमान हिरे दिले आहेत. त्यापैकी एक पै. काकासाहेब पवार.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!