
स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व तालुका विधी सेवा समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्री नरसिंह हायस्कूल, धोम ता. वाई येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती श्री राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या महाशिबीरामध्ये नागरिकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन कौटुंबिक व जमीन विषयक प्रश्नांवर सल्ला तसेच महिला, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपलब्ध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांची माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार असून काही ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिबीरात आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड इत्यादी नोंदणी व अद्यावतीकरण केले जाणार आहे. आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप व मोफत शस्त्रक्रियेकरिता नोंदणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती करून घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए.एस. वाघमारे व जिल्हा न्यायाधीशतथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, वाई यांनी केले आहे.

