
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणविषयक कायद्याच्या विविध तरतूदी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे हानिकारक परिणाम आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ विषयी जनजागृती शिबीर धनंजयराव गाडगीळ वाणिज्य कॉलेज, सातारा येथे संपन्न झाले.
यावेळी प्रा. डॉ. राजश्री जावळे यांनी पर्यावरणविषयक कायद्याच्या विविध तरतूदी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे हानिकारक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे, घटक, उपाय आणि कायद्यातील तरतूदी आणि त्यासाठीच्या शिक्षा या विषयी सविस्तर माहिती दिली.
दिवाणी न्यायाधीश क.स्तर प्रविण भिडे यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण, त्यासाठी असलेली विशेष न्यायालये, गुन्हे घडण्याची कारणे, संभाव्य परिणाम, या कायद्यान्वये असलेल्या शिक्षा, त्यातील तरतूदी, पिडीत बालकास असलेले संरक्षण, त्याच्या पुनवर्सनाकरीता असलेल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची पिडीतांसाठी योजना याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच या योजना मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये १६९ विद्यार्थी व विद्यार्थीनी त्यांच्या विभाग प्रमुखासह उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे शेवटी लघुलेखक दिलीप भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.