दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा पालक न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी केले.
कोरेगाव येथील गजरा मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, ॲङ सुखदेव पाटील, ॲड अशोककुमार वाघ, ॲड वसंतराव भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. जाधव म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा देण्याचे काम सुरु असून यातून गरजूंना न्याय मिळत आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होत आहे. त्याचबरोबर लोक न्यायालय व लोकअदालत याही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सातारा न्यायालयाचा विधी जागर पथनाट्याचा कार्यक्रम खूप चांगला असून या पथनाट्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लाभांची माहिती सहजपणे समजते. हा पथनाट्याचा कार्यक्रम प्रत्येक गावी करा. यासाठी जे करावे लागेल ते केले जाईल, असे आश्वासनही श्री. जाधव यांनी यावेळी दिले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या दरम्यान कायदेविषयक शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती देण्यात आली. तसेच जुलै महिन्यामध्ये पाटण, वाई व महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये भूस्खलन झाले होते तेथील नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्यात आली. सध्या न्यायालयाकडून न्याय आपल्या दारी ही योजना राबवित आहे. या योजनेचाही जिल्ह्यातील नागरिकांना लाभ झाला आहे. तसेच आज कोरेगाव येथे जिल्हा विधी सेवा योजनांचे महाशिबिर भरविण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पोलीस अधिक्षक श्री. बन्सल म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात महिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 3 प्रशिक्षणाचे वर्ग झाले अहेत. या प्रकल्पांतर्गत शाळेतील महाविद्यालयातील मुलींना त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देण्यात येत आहे. तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, शासनाचा प्रत्येक विभाग त्यांच्याकडील असलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. संगणकीकृत सातबाऱ्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून हे काम अचूक करण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केले आहे. ग्रामीण भागात गरजूंना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा मोबदला थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा होत आहे. कोविड संसर्ग परिस्थितीत अनेक लोकांना मदत करण्यात आली असून जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी दत्तक पालक योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विविध गावांमध्ये शिबीरांचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच कोविड काळात बाहेर राज्यातील लोकांना बाहेर राज्यात जाण्यासाठी नागरिकांना मदत केली. तसेच भूस्खलन झालेल्या गावातील नागरिकांना कायदेविषयक सर्व मदत करण्यात आले असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार दिवाणी न्यायाधीश गिरीष माने यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
शासकीय स्टॉल ठरले नागरिकांचे आकर्षण
महसूल, पंचायत समिती, पोलीस विभाग, कृषी विभाग, महिला व बाल कल्याण, आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, समाजकल्याण यासह विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर नागरिकांनी गर्दी करुन आपल्या संबंधित असलेल्या योजनांची माहिती करुन घेतली. स्टॉलवर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना सविस्तर दिली.