दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । दुधेबावी । अल्पवयीन मुला मुलींचे विवाह, कामाचे ठिकाणी स्त्रीयांचे लैगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण, हुंडाबळी याबाबत कायदेविषयक बाबी समजावून देत दिवाणी न्यायाधीश सौ. ए. एच. ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात कायदा सुव्यवस्था विषयक सखोल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या सुचनेनुसार जयभवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिरकवाडी, ता. फलटण येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थावरुन मार्गदर्शन करताना दिवाणी न्यायाधीश न्या. सौ. ए. एच. ठाकूर बोलत होत्या, यावेळी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. बी. ढवळे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. डी. साबळे, चौथे सहदिवाणी न्यायाधीश केदार पोवार, पाचवे सहदिवाणी न्यायाधीश युवराज पाटील, जय भवानी एज्युकेशन सोसायटी तिरकवाडीचे अध्यक्ष आनंदराव शितोळे, संस्थेचे सचिव राजेंद्र शितोळे, नितीन शितोळे, अजय शितोळे, संचालक गुलाबराव डांगे, रघुनाथ सोनवलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक गुंजवटे सर, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर काळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनी, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, ग्रामपंचायत तिरकवाडी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तिरकवाडी विकास सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव व सदस्य, तसेच पंचक्रोशीतील महिला वर्ग, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
तिसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. डी. साबळे यांनी अल्पवयीन मुला – मुलींचे विवाह व कामाच्या ठिकाणी स्त्रीयांचे लैंगिक शोषण याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. बी. ढवळे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रीयांचे संरक्षण व हुंडाबळी याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाची पार्श्वभूमी, रुपरेषा, जागतिक महिला दिन याविषयी माहिती दिली. अँड. पूनम करपे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व याविषयावर माहिती देत मार्गदर्शन केले. वकील संघाचे अध्यक्ष अड. एम. के. शेडगे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक गुंजवटे यांनी प्रशाळेच्यावतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले. जयभवानी एज्युकेशन सोसायटी, जयभवानी विद्यालय, तिरकवाडी ग्रामपंचायत, विकास सोसायटी यांचेवतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले.