दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । सातारा । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने जिल्हा कारागृहात विधी जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, अधीक्षक राजेंद्र तागडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत बंद्याना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देवून बंदी हा मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र असल्याचे सांगितले. तसेच ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी कारागृहातील विधी सेवा चिकित्सालयातील पॅनल विधीज्ञांची भेट घेऊन आपल्या अडचणी त्यांच्यामार्फत प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आवाहन केले.
तसेच विधीज्ञ ॲड. शरद जांभळे यांनी बंद्याचे हक्क व बंद्यांसाठी कायदेशीर सेवांची उपलब्धता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.