खोटी विधाने करणार्‍यांविरुध्द कायदेशीर कारवाई करणार

परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांचा इशारा


स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत आमच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या 18 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अशावेळी आज खोटी विधाने करुन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा विधाने करणार्‍यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, अशा इशारा परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी दिला आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती केली जावी, मराठी भाषा हद्दपार व्हावी या भावनेचे हे लोक असून मराठी भाषेची मारेकरी असणार्‍यांना मतदार पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वासही श्री. कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला.

विरोधी पॅनेलकडे कोणतीही मुद्दे नाहीत. मागच्या दहा वर्षात त्यांच्याकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. जे कधीही साहित्य परिषदेकडे फिरकले नाहीत, साहित्य परिषदेचे सभासदही नाहीत, त्यांनी आमच्या बदनामीची मोहीम उघडली आहे. सातार्‍यात यशस्वी झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पोटदुखी त्यांना झाली आहे. सातार्‍यातील 99 व्या संमेलनाच्या यशामुळे सर्व सभासद आनंदित आहेत, त्यांचा आम्हाला भरघोस पाठिंबा आहे.

आमचा विजय मोठ्या मताधिक्याने होणार आहे, त्यामुळे विरोधकांचा तीळपापड झाला आहे. काही छोटी प्यादी पुढे करुन बदनामी करणे, कटकारस्थान करणे असे प्रयोग सुरु आहेत. साहित्य परिषदेवर प्रशासक आणण्याचा डाव त्यांचा उधळला आहे, त्याचा राग मनात धरुन पुरावे नसलेले बेछूट आरोप केले जात आहे. मतदार त्यांना मतपेटीतून उत्तर देतील परंतु कायदेशीर कारवाई करुन त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. मतदार त्यांच्या अशाप्रकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही, याची खात्री आहे. आमच्या आघाडीचे सातारा जिल्हयातील तीन उमेदवार बिनविरोध झाल्याचाही पोटशूळ त्यांना उठलेला आहे. जिल्हयातील सर्व सभासद परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या पाठीमागे उभे राहतील. मी जिल्हयाचा सुपुत्र असल्याने मतदार अशा खोट्या आरोपांना भीक घालणार नाही, असेही विनोद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!