
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सातारा । येथील स्व. सौ. मालतीबाई रामकृष्ण गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा येत्या रविवारी दि. 9 मार्च रोजी समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
यामध्ये स्वर्गीय सौ. मालतीबाई रामकृष्ण गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास तज्ञ प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘मातृदेवो भव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्वर्गीय मालतीबाई गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिलांचे अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन पठण, कुरणेश्वर येथील स्मृती स्थळाचा विकास, कचरावेचक महिलांचा सत्कार, गरजूंना व्हिलचेअर तसेच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले यांनी संपादन केलेले ‘आई आमची आणि साहित्यातील’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण अरुण गोडबोले, डॉ.अच्युत गोडबोले, अशोक गोडबोले, सौ.उषा शिंत्रे व गोडबोले कुटुंबीय यांनी केले आहे.