ताणतणाव सोडून परीक्षेला सामोरे जा – दमयंती कुंभार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
शाळेतील प्रत्येक मूल हे वेगळे असते. मात्र, या प्रत्येक मुलाकडे वेगवेगळ्या क्षमता असतात. या क्षमतांचा विकास होणे काळाची गरज आहे. आपण योग्य दिशेने विचार केला तर योग्य मार्गाने जाता येते, त्यासाठी मुलांनी शिकून मोठे झाले पाहिजे व योग्य मार्गाने चालून जीवनामध्ये सकारात्मकता जोपासली पाहिजे. दहावीची परीक्षा ही आयुष्यातली पहिली परीक्षा नसून अशा आपण कितीतरी परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे ताणतणावविरहित परीक्षेला सामोरे जा, असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या विषयतज्ज्ञ व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दमयंती कुंभार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय, जिंती, तालुका फलटण येथे इयत्ता दहावी शुभचिंतन व निरोप समारंभ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजेंद्र दौलतराव रणवरे होते. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, प्रमुख वक्ते प्राचार्य चंद्रकांत ढोबळे, पी. एन. रणवरे, एम. एन. रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंभार पुढे म्हणाल्या की, आपले आरोग्य जपा. कोणतेही काम टाळू नका. त्या कामांमध्ये सकारात्मकता शोधा व आनंदाने काम करा. आपल्या आई-वडिलांना मदत करा. आपल्या शिक्षकांप्रती आदर ठेवा. शाळेत आहे तोपर्यंत त्यांची किंमत जाणा व आयुष्याला आकार द्या. संस्कार व संस्कृती विसरू नका.

प्रमुख वक्ते प्राचार्य चंद्रकांत ढोबळे म्हणाले की, मोबाईल हे सध्याच्या पिढीचे व्यसन झाले असून त्यापासून दूर झाले पाहिजे व अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात करिअर केले तर निश्चितच आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो. सध्याच्या काळात कृतीयुक्त शिक्षणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे जीवनाला लवकरात लवकर स्थिरता मिळते. तसेच उंच स्वप्ने मनात बाळगून ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करून दर्जेदार मानव बनणे अपेक्षित आहे.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, पी. एन. रणवरे, एम. एन. रणवरे, नवनाथ रणवरे, पी. जे. जगताप तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तनया जगताप, जिया तांबोळी, उत्कर्षा रणवरे, वेदिका रणवरे यांनी आपले विचार मांडले.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास एक चार्जिंग साऊंड सिस्टीम यावेळी भेट दिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सही रणवरे, शिफा तांबोळी, सानिया जमादार, जान्हवी ढवळे, अनुजा बोबडे यांनी केले. आभार शिवांजली साळुंखे हिने मानले. शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!