दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२३ । फलटण । तालुक्यातील वाखरी येथे असणाऱ्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे असणाऱ्या इमारत धोकादायक झाली आहे. तरी यामध्ये जे आता विविध स्टंट करत आहेत; त्यामध्ये त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ आहेत. यांनी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला सोडून शाळेसाठी जर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली तर श्रीराम एज्युकेशन सोसायटी नक्कीच शाळेसाठी सुसज्ज अशी इमारत उभारेल; अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी दिली.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना सूर्यवंशी (बेडके) म्हणाले की, वाखरी येथे शाळा बांधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता; परंतु वाखरी ग्रामस्थच वन विभागाकडे वारंवार तक्रार करत आहेत; त्यामुळे शाळेचे बांधकाम बंद पडले आहे. आगामी काळामध्ये वाखरी येथे सर्व सोयी सुविधांच्या युक्त असे सुसज्ज शाळा बांधण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे; तरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जागा उपलब्ध करून द्यावी; असे आवाहन यावेळी केले.