दैनिक स्थैर्य । दि. 12 जुलै 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । फलटण नगरपालिकेकडून शहरातील जनतेच्या आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते अशा अनेक मुलभूत नागरी सुविधांकडे मोठ्या प्रमणावर दुर्लक्ष झाले असून या गंभीर समस्यांबाबत राजकीय पुढारी बेफिकीर असल्याचा सूर फलटणकरांमधून उमटत आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक प्रश्नांकडे सत्ताधार्यांसह विरोधी नगरसेवक व प्रशासकीय अधिकार्यांकडूही कानाडोळा झाल्याने पालिकेला संकलित कर भरुनही आवश्यक मुलभूत सुविधा मिळत नसल्याने शहरवासियांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणूकीचा बिगुल नुकताच वाजल्यानंतर यानिमित्ताने गेल्या 5 वर्षातील पालिकेच्या कारभाराचा पाढा अनेक नागरिक वाचून दाखवत आहेत. सत्ताधार्यांची मनमानी, विरोधकांच्यात दवाबाचा अभाव आणि पालिकेतील कारभार्यांच्यात समन्वयाचे दुर्भिक्ष यातून नागरिकांच्या वाट्याला असुविधांचे दुष्टचक्र सुरु असल्याचे अनेक फलटणकर बोलून दाखवत आहेत.
फलटण शहरात गेल्या दोन – अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेचे रेंगाळलेले काम नागरिकांना मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. ठिकठिकाणी उकरलेले रस्ते, त्यातून रस्त्यांची दुरावस्था, छोटे – मोठे अपघात, योजनेसाठी झालेल्या खोदकामातून पिण्याच्या पाण्याच्या निर्माण झालेल्या समस्या, कामाचा निकृष्ठ दर्जा आदी असुविधांचा सामना या योजनेच्या कामांमुळे नागरिकांना आजही करावा लागत आहे.
शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबतही नागरिकांच्यात असंतोष असून पाणी वाटपात होणार्या विषमतेवरुन शहरवासियांमध्ये नाराजी दिसून येत आहे. शहरातील काही भागात दिवसातून दीड – दोन तास नियमित पाणी पुरवठा होत असतो तर काही भागांत केवळ अर्धा ते एक तासच पाणी पुरवठा होतो. शिवाय भुयारी गटार योजनेच्या कामास सुरुवात झाल्यापासून अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांच्या असंख्य तक्रारीनंतरही यावर कायमचा तोडगा काढण्यात पालिकेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. पाण्यासारख्या जिवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्याबाबत पालिकेकडून होणार्या गलथान कारभारामुळे फलटणकरांच्यात असलेले असमाधान प्रकर्षाने स्पष्ट होत आहे.
आरोग्याच्या प्रश्नावरही फलटण पालिका उदासिन असून नागरिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आवश्यक असणारी नागरी स्वच्छता राखण्यात पालिकेची उदासिनता पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी उघड्यावर पडणारा कचरा, घंडा गाड्यांची अनियमितता, स्वच्छता अभियानात कृतीशून्यता यातून शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य नित्याचेच असून यातून वारंवार साथीचे रोग शहरात फैलावत असल्याचेही नागरिक बोलून दाखवत आहेत. शहरात स्वच्छतागृहांची समस्याही मोठ्या प्रमाणावर असून या स्वच्छतागृहांची डागडुजी, स्वच्छता वेळोवेळी होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच बाजारपेठांच्या लगतही सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी होणे आवश्यक असल्याचे अनेकांचे मत आहे.
शहरात रस्त्यांची समस्या नेहमीच ऐरणीवर राहिली असून आत्ता जरी याला भुयारी गटार योजनेच्या कामाचे निमित्त असले तरी यापूर्वीही शहरवासियांना खड्डेयुक्त रस्त्यांवरुनच ये – जा करावी लागली आहे. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनून नागरिकांना वाहन चालवणे सोडाच अगदी पायी जाणेही या रस्त्यांवरुन अवघड होताना दिसले आहे. ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता’ हा प्रश्न फलटणकरांकडून नेहमीच उपस्थित होत आलेला आहे. रस्त्याचे काम जरी झाले तरी ते इतके निकृष्ठ दर्जाचे असते की एकाच पावसात या रस्त्यांची पुन्हा दयनीय अवस्था होत असते असाही आरोप फलटणकरांमधून होत आहे.
शहर सुशोभीकरणाच्या बाबतीतही फलटण पालिका पिछाडीवर असून नागरिकांसह लहान मुलांसाठी उद्याने, क्रिडांगणे आदी सुविधा व्यापक स्वरुपात पुरवण्याकरिता पालिकेकडे दृष्टीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील प्रमुख चौकांमधील महापुरुषांचे पुतळे परिसराचे सुशोभिकरण करुन पुर्नस्थापित करण्यात सुरु असलेली दिरंगाई नगरसेवकांसह अधिकार्यांच्या कर्तबगारीची साक्ष असल्याचे फलटणकर उपरोधाने बोलत आहेत. शहरातील गजानन चौक, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर शहरवासियांना नेहमीच अडथळ्याचा ठरत असून पालिकेकडून याकडेही दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे मत आहे.
शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्न सोडवण्यात पालिकेला अपयश आले असून शाळा, बँका, बाजारपेठा, भाजी मंडई आदी ठिकाणी वाहन पार्किंगच्या नियोजनाअभावी होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. शहरात विविध ठिकाणी लाखो – कोट्यावधी रुपये खर्च करुन भाजी मंडई, व्यापारी संकुल, वाहन पार्किंग उभारण्यात आलेली आहेत मात्र त्याचा वापर केला जात नसून या उभारलेल्या सुविधांच्या विनावापरामुळे समस्या ‘जैसे थे’ च असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
फलटण शहरात येणार्या एस.टी. बसस्थानकातील विकास कामे फलटण पालिकेच्या कक्षेत येत नसली तरी फलटणकरांच्या निगडीत असणार्या या समस्येकडे सत्ताधारी आणि विरोधक दुर्लक्षच करत आलेले आहेत. आजही पावसानंतर बसस्थानकाला प्राप्त होणारे तलावाचे रुपडे प्रवाशांच्या त्रासात भर घालत आहे. वास्तविक पाहता फलटण तालुक्याला मोठ्या प्रमाणावर राजकीय सत्ताकेंद्रे असूनही संबंध तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या एस.टी. बसस्थानकाच्या प्रश्नाकडे सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झालेले अहे.
फलटणला विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा या तिन्ही ठिकाणी प्रतिनिधीत्व आहे. विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर, विधानसभा सदस्य आमदार दीपक चव्हाण या नेतेमंडळींनी शहरासाठी विकास निधींची उपलब्धता करुन दिलेली आहे मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. पालिकेच्या कारभारात नगरसेवक व अधिकार्यांच्यात विकासकामांऐवजी केवळ ठेकेदारीचे राजकारण रंगत असून अशा गैरकाराभारामुळेच शहरवासियांना असुविधांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.
बारामतीशी तुलना
फलटणपासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर असणार्या बारामतीशी तुलना फलटणकर कायम करत असून बारामतीतील रस्ते, स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, बगिचे, सुसज्ज शासकीय रुग्णालये, बसस्थानके यांच्या तुलनेत आपले फलटण किती पिछाडीवर आहे याची साक्ष देत असल्याचे फलटणकर सांगत आहेत. तसेच बारामतीचे लोकप्रतिनिधी शहरातील विकासकामांवर स्वत: लक्ष देत असल्याने नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून कुचराई होत नसून फलटणच्या लोकप्रतिनिधींनीही तसा अंकुश प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे मत फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.