इच्छुकांच्या महत्वकांक्षेमुळे नेत्यांना घाम; शेवटच्या दिवशी अर्ज माघारीची होणार कसरत, रामराजे यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक गुंडाळली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | सातारा | जिल्हा बँकेच्या राजकीय आखाड्यात इच्छुक उमेदवारांनीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फोडला आहे .विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले . राष्ट्रवादीची आयोजित बैठकच न झाल्याने उमेदवारी अर्ज कोणी माघारी घ्यायचा याचा निर्णय होऊ शकला नाही . परिणामी जिल्हा बँकेच्या राजकीय लढतीचे चित्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारीच स्पष्ट होणार आहे .

राष्ट्रवादीच्या समावेशक पॅनेल व उमेदवारांची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे . बुधवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे . या दरम्यान अर्ज कोणी मागे घ्यायचा याचा कोणताच अंतिम आदेश न आल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या उमेदवारांनी अर्ज माघारी न घेण्याचा हट्ट कायम ठेवल्याने नेत्यांची धाकधुक वाढली आहे . त्यातच विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखलं करण्यात आले आहे . राष्ट्रवादीची मंगळवारी होणारी बैठकच न झाल्याने अर्ज माघारीचा तिढा कायम राहिला

दिवाळी संपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे फराळ वाटप आणि सदिच्छा भेटीचे राजकीय सत्र सुरू राहिल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे . त्यामुळे राष्ट्रवादीची अंतिम रणनीती काय ? पक्षाने अंतिम केलेला उमेदवार लढणार का ? की ऐनवेळी अर्ज माघारीसाठी राजकीय दबाव टाकला जाणार या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहेत . मात्र रामराजे सायंकाळी उशिरा साताऱ्यात आले तर जिल्हा बँकेचे रणनितीचे चित्र स्पष्ट होईल असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले . खटाव, जावळी पाटण व कोरेगाव येथील राजकीय तिढा सोडविण्यात राष्ट्रवादीला यश आलेले नाही . त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशीच रामराजेच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची उमेदवार अंतिम केली जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!