
दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । जीएस महानगर कॉ-ऑप बँकेचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲङ उदय शेळके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत क्लेशदायक असून बँकींग क्षेत्राची उत्तम जाण असणारा तज्ज्ञ, जीवाभावाचा सहकारी आज गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ॲङ उदय शेळके यांना श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ॲङ उदय शेळके यांनी जीएस महानगर कॉ.-ऑप बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणाऱ्या स्वर्गीय गुलाबराव शेळके यांचा बँकींग क्षेत्रातला वारसा सक्षमपणे सांभाळला होता. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम काम केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, बँकींग क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता अशी ॲङ उदय शेळके यांची ओळख होती. ॲङ उदय शेळके यांचे निधन ही अहमदनगर जिल्ह्याची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.