खा. शरद पवारांवर टीका करणाऱ्या महेश शिंदे यांचा बोलवता धनी वेगळाच – आ. शशिकांत शिंदे यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । कुडाळ । महेश शिंदे अपघाताने निवडणुकीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडून आले असून त्यांच्या टीकेला जिल्ह्यातच नव्हे तर साध्या गल्लीमध्ये देखील कुणी महत्व देत नाही. त्यामुळे आ. महेश शिंदे यांच्या तोंडून बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याचा संशय मला आहे. आ. महेश शिंदे यांच्या तोंडुन विधान करून कोणीतरी राजकारण करत आहे, असा खळबळजनक शोध कोरेगावचे माजी आमदार व विधान परिषदेचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जावळी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी प्रसंगी शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम जावळी बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे बुवासाहेब पिसाळ प्रतापगडचे माजी संचालक चंद्रकांत तरडे, इनामदार चंद्रकांत गवळी साधू चिकणे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले शरद पवार सारख्या देशातील दिग्गज नेत्यांवर आरोप करून जर कोणी मोठं होत असेल तर हा महेश शिंदे यांचा खूप मोठा गैरसमज आहे. अशा पद्धतीचे आरोप केल्यानंतर उलट आ. महेश शिंदे यांची बदनामी झाली आहे. खा. शरद पवारांवर केलेल्या आरोप आणि महेश शिंदे लोकांच्या नजरेतून उतरले आहेत. राजकारण करायला विषय असतात. मात्र, स्वतःचं अस्तित्व व महत्त्व वाढवण्यासाठी राज्यातील देशातील दिग्गज नेत्यांवर आरोप करायचे आणि स्वतःचं महत्त्व वाढवून घ्यायचं असा खटाटोप आ. महेश शिंदे यांचा उघड झाला आहे. अपघाताने निवडून आलेल्या आ. महेश शिंदे यांना जर आपण स्वतः खूप मोठे झालं आहे आपलं नेतृत्व मोठं झालं आहे असा जर गैरसमज झाला असेल तर तो येत्या काळात लवकर हा उतरेल.

आ. महेश शिंदे यांच्याबरोबर असणारी काही मंडळी रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मचारी आहेत. पवार साहेबांच्या आशीर्वादानेच ही मंडळी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. पवार साहेबांनी यांच्यावर हात ठेवला नसता तर यांना कोणीही विचारलं देखील नसतं, याचं भान महेश शिंदे यांना असावं. मात्र उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे अपरिपक्व आमदार दुर्दैवाने कोरेगाव तालुक्याला लाभले असा टोला देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.

महेश शिंदे यांचा व्यवसाय व इतर काही गोष्टींवर शरद पवारांचा हात होता म्हणूनच महेश शिंदे यांचे व्यवसाय वाढले याचा विसर महेश शिंदे यांना पडला आहे. निदान खाल्ल्या मिठाला तरी जागावे असा टोला देखील शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!