लक्ष्मण सोनवलकर, अमित रणवरे तालुकाध्यक्ष तर बापूराव शिंदे शहराध्यक्ष; भाजपात फलटणची खांदेपालट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 21 एप्रिल 2025 | फलटण | भारतीय जनता पार्टीच्या फलटण तालुकाध्यक्ष पदी युवा नेते लक्ष्मण सोनवलकर, युवा नेते अमित रणवरे नियुक्ती करण्यात आली आहे. तर फलटण शहराध्यक्ष पदी युवा नेते बापूराव शिंदे यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार तथा भाजपा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की, फलटण तालुक्यातील प्रत्येक घरात अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील “हर घर भाजपा” हे अभियान यशस्वी राबवण्यासाठी फलटणचे नूतन तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष नक्कीच प्रभावीपणे कामकाज करतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे. यासोबतच येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल अशी खात्री सुद्धा आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांनी कामकाज करताना सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून कामकाज करावे. सर्वसामान्य नागरिकांच्या विविध अडीअडचणी ह्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत राहणे गरजेचे आहे, असे मत सुद्धा यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

यामध्ये लक्ष्मण सोनवलकर यांच्याकडे फलटण तालुक्यातील कोळकी, गुणवरे व विडणी ह्या जिल्हा परिषद गटाची जबाबदारी राहणार आहे. अमित रणवरे यांच्याकडे साखरवाडी, तरडगाव व उत्तर कोरेगावची जबाबदारी असणार आहे. यासोबतच बापूराव शिंदे यांच्यावर फलटण शहराची जबाबदारी राहणार आहे.

फलटण तालुक्यात भाजपाने साधले जातीय समीकरण…

भारतीय जनता पार्टी ही कायमच राज्यामध्ये जातीय समीकरण साधण्यात अग्रभागी असते. त्याच प्रमाणे फलटण तालुक्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीने जातीय समीकरण साधले असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. यामध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण सोनवलकर, माळी समाजाचे प्रतिनिधी म्हणून बापूराव शिंदे तर मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून अमित रणवरे यांची नियुक्ती केली असल्याने फलटण तालुक्याच्या राजकारणातील जातीय समीकरण साधले असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!