वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा – सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ फेब्रुवारी २०२३ । नागपूर । विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांना कधीच अपयश येणार नाही. कायदा आणि समाजाला, न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मुल्यासह पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वात एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्ताऐवजात परिवर्तनात्मक क्षमता असून प्रास्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगीकृत केलेले आहेत. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना केले.

याप्रसंगी त्यांनी ‘दया आणि न्याय’ यांच्यातील फरक सुद्धा अधोरेखित केला. न्यायामुळे समाज हा सक्षम आणि स्वयंपुर्ण होतो तर दयेमुळे केवळ काही क्षणासाठी अन्यायाचे दुःख दुर होते . केवळ दयादानाचे काम न करता न्यायादानाला अनुकूल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे.  न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करतांना न्यायाची दये सोबत गफलत करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या वर्धा रोड स्थित वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश आणि वीधी विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई आणि कार्यवाहक मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय आणि प्र- कुलगुरू संजय गंगापूरवाला, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ . विजेंदर कुमार याप्रसंगी उपस्थित होते.

दीक्षांत सोहळ्यात 2016 आणि 2017 च्या तुकडीच्या 220 विद्यार्थांना पदवी प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये 158 पदवीपूर्व पदवी बीए एलएलबी (ऑनर्स) आणि 2016 ते 2020 पर्यंच्या पाच तुकडीमधील 56 एलएलएम पदव्युत्तर पदवींचा समावेश होता. या दीक्षांत सोहळ्यात संवैधानिक कायदा, व्यावसायिक कायदा, यासारख्या विविध विषयात विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदकही प्रदान करण्यात आले तसेच 6 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देण्यात आली.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूरची स्थापना महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये उत्कृष्ट आणि सर्वांगीण कायदेशीर शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून केली असून हेहे विद्यापीठ B.A.LL.B (ऑनर्स), B.A.LL.B (ऑनर्स इन ज्युडिकेशन अँड जस्टिसिंग), BBA.LL.B (ऑनर्स), LL.M आणि PhD हे अभ्यासक्रम राबवित आहे. ज्यात B.A.LLB (ऑनर्स इन अॅडज्युडिकेशन अँड जस्टिसिंग) हा अभ्यासक्रम राबविणारे हे देशातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे.

दीक्षांत सोहळ्याच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वागत भाषणात राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या गेल्या सहा वर्षातील कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोविड काळातही विद्यापीठाच्या वारंगा येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.

या कार्यक्रमात विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!