दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । सातारा । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्लाप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी एड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली असून 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. तथापि, बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना त्यांचा ताबा मिळाला नव्हता.
सातारा पोलीस एड. सदावर्ते यांचा ताबा गुरुवारी सकाळपर्यंत घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सातार्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सातार्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सातारा पोलिस सदावर्ते यांचा ताबा घेऊन सातार्याला रवाना होतील असे वृत्त आहे. सदावर्ते यांना सातारा पोलिसांना चौकशीसाठी किती दिवस द्यायचे याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयात घेईल.
मुंबईच्या सेशन कोर्टात जो युक्तिवाद झाला. त्यानुसार मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे इतर प्रकरणात मुंबई परिसरात विविध कलम दाखल केले जात आहेत. तसेच या प्रकरणाची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न होत आहे म्हणून न्यायालयाकडून सदावर्ते यांना पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सदावर्ते यांना जामिनाचा अधिकार प्राप्त होतो पण इतर प्रकरणी त्यांच्यावर दाखल असल्याने त्यांना 17 दिवसाची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली आहे.