दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भाजपा प्रदेश जैन प्रकोष्ठने सुरु केलेले कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियान आदर्श समाजसेवेचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राज पुरोहित, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष ललित गांधी, सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे संजय चोरडिया, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी आदी उपस्थित होते. जागतिक कर्करोगदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जैन प्रकोष्ठ तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बसच्या माध्यमातून राज्यात १५० कर्करोग तपासणीशिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांतून २५ हजारांहून अधिक नागरिकांच्यामोफत कर्करोग तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आदि तपासण्या होणार आहेत, अशी माहिती जैनप्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांनी दिली. या अभियानासाठी जैन महासंघाने कर्करोगनिदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे असलेली बस उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विजय परमार, संजय चोरडिया, गिरीश पारख यांचा तसेच महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ललित गांधी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.