‘लातूरची येळवस’… महाराष्ट्रासाठी नवलाई…!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आज, सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी समुद्राला जशी पाण्याची भरती येते, तशी शेताशेतात माणसांची भरती येते. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला, मात्र शेकडो वर्षांची परंपरा असलेला एक सण म्हणजे ‘येळवस’, म्हणजे ‘वेळाआमावस्या’. हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा असतो. ३० डिसेंबर रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात हा सण साजरा केला जातो. जिल्हा प्रशासन या दिवशी स्थानिक सुट्टीही देते. त्यामुळे ही ‘वेळामावस्या’ मोठ्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे. त्याविषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेखप्रपंच…

कसा असतो सोहळा!!

वेळाआमावस्येच्या चार दिवस अगोदर साधनांची जमवाजमव सुरू होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो आणि वेळाआमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. बेसनपीठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेल्या उकडलेल्या पदार्थांसह शिजवलेली भाजी म्हणजे भज्जी. ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपर्‍यात फिरलो, वेगवेगळे पदार्थ खाल्ले, पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही. या डीशची तुलना कोणतेही पंचतारांकित हॉटेलही करू शकणार नाही. याबरोबर दिले जाणारे अंबिल म्हणजे तर राजदरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे असते. चार दिवसांचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा, फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते, ते अंबिल (काही जणांचे तोंडेही सुजतात, दुसर्‍या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे). भल्या थोरल्या भाकरी, गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजतगाजत घरातून डोक्यावरून शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसर्‍या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो…!

काय आहे परंपरा…

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणार्‍या सातव्या अमावस्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषीसंस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्न्याचे महत्त्व अविवाद असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

भारतीय द्विपकल्पात सिंधूसंस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या (सप्त सिंधु) भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंधु ‘मातृका’ म्हणून पुजण्याची परंपरा सुरू झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पूजण्याची परंपरा आहे, तिला लातूर जिल्ह्यात ‘आसरा’ म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळाआमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करून मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ब्लाऊजपीसाने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला पाच फेर्‍या मारतात आणि ‘वलग्या वलग्या सालन पलग्या’ असे म्हटले जाते. हे कन्नड वाक्य आहे. कन्नडात ‘वलगे वलगे सालम पलगे’ असा उच्चार होतो. त्याचा अचूक अर्थ वांग्याची भाजी आणि भाकर (रोडगा) तुम्हाला (लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आमच्यावर अनुग्रह करा, असा होतो.

सकाळी पूजा करून आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा आस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरून उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे, खाल्लेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा दुसर्‍या कोपीवर जाऊन जेवायचे. एकेकाळी १२ बलुतेदार, आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे खावू घातलं जात होतं. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू, हरभरा यांच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करून ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरून घरी जायचे. असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार (माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्यासह अनेकांचे दैवत), गाढवांचा बाजार, सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख), तमाशाचे मोठ मोठे फड, यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने खर्‍या अर्थाने चांगभलं असे.

असा हा सण आणि त्याची परंपरा आहे. आजही मोठ्या हौसेने ही सांभाळली जाते. चला तर मग ‘येळवस’ साजरी करूया. महान परंपरेचा वारसा जपूया…!

– युवराज पाटील


Back to top button
Don`t copy text!