फलटण येथे दि.25 रोजी ‘स्व.यशवंराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’; संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । भारताचे थोर नेते व महाराष्ट्राचे शिल्पकार तसेच श्रेष्ठ साहित्यिक, रसिक वाचक, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 9 वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन, गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायं.5:30 या वेळेत येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले व कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी बेडके यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

संमेलनाबाबत अधिक माहिती देताना दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाणांच्या विविध पैलूंपैकी साहित्यिक व रसिक वाचक यांचे स्मरण दरवर्षी व्हावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीपासून (सन 2012) आम्ही येथे त्यांच्या नावाने महाराष्ट्रात प्रथमच अशा साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी करीत असतो. या संमेलनामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दरवर्षी विविध साहित्यिक कार्यक्रम होत असतात.

संमेलनाची रुपरेषा स्पष्ट करताना सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी सांगितले की, यंदाच्या संमेलनात सकाळच्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन, सातारा येथील पटकथा लेखक व साहित्यिक प्रताप गंगावणे यांना सन 2019 चा तर विटा (जि.सांगली) येथील ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांना सन 2020 चा यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्काराचे वितरण, मसाप फलटण शाखा आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न होणार आहे. संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात प्रसिद्ध कवियत्री कै.शांताबाई शेळके जन्मशताब्दीनिमित्त फलटण येथील ज्येष्ठ कवियत्री श्रीमती आशाताई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व लायन्स क्लब, फलटण (प्लॅटिनम) अध्यक्ष सौ.निलम लोंढे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रित महिला व युवतींचे कवीसंमेलन तर ग्रामीण कथाकथनकार प्रा.रविंद्र कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली कापशी (ता.फलटण) येथील ज.तु.गार्डे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून या साहित्य संमेलनासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी – बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, कार्यवाह अमर शेंडे, ताराचंद्र आवळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!