स्थैर्य, फलटण, दि. १५ : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन. राज्य निर्मितीनंतर विविध योजना आणून राज्याचा विकास करण्याचे मोठे कार्य माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी केले. स्व. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावा यासाठी ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ गावपातळीपर्यंत पोहोचून त्यांचे विचार राज्याच्या तळागाळात जायला हवेत असे मत विधानपरिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान केले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते आज झाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले , देशाचे माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा ‘आधुनिक भगीरथ’ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. आज प्रकाशित झालेल्या ‘लोकराज्य’च्या स्व. शंकरराव चव्हाण विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.
स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते. सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
जगात आई-वडिलांसारखा गुरु नाही. त्यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. स्व. चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असं हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. मी शाळेत असताना शंकररावांना पाहिलं होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.
स्व. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, यंदा राज्याचा हीरक महोत्सव आणि माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण होणे ही आजची गरज आहे. स्व. चव्हाण यांच्यावरील गौरव ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकातील मान्यवरांचे विचार आणि स्व. चव्हाण यांच्याबद्दलची माहिती ही केवळ त्यांची वैयक्तिक माहिती नसून राज्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीचे चित्र आहे. वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात मोलाचा सल्ला देण्याचे काम त्यांनी केले. स्व. चव्हाण यांचे विचार, दूरदृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
गौरव ग्रंथ व लोकराज्यचा विशेषांक संग्राह्य – अशोक चव्हाण
मंत्री अशोक चव्हाण म्हणाले , माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने अनेक विकास कामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ आणि लोकराज्यचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत.
स्व. चव्हाण यांचे जल नियोजनातील काम अतुलनीय – देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. कठोर प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला, तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील. स्व. चव्हाण साहेबांनी जल नियोजनातील काम हे अतुलनीय आहे. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत. जल नियोजनातून पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या गौरव ग्रंथाला दिलेले ‘आधुनिक भगीरथ’ हे नाव सार्थ आहे.
यावेळी मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजित कदम, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार भाई जगताप, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, दै. सत्यप्रभाचे संपादक संतोष पंडागळे आदी उपस्थित होते.
मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी प्रास्ताविकात स्व. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्तच्या विविध उपक्रमांची तसेच गौरव ग्रंथाची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी आभार मानले.
लोकराज्य जुलै 2020 ‘डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष’ विशेषांक प्रकाशित
माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य मासिकाचा जुलै 2020 चा अंक ‘जन्मशताब्दी’ विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले.
या विशेषांकात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांचा सहवास लाभलेले माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील-चाकूरकर आदी दिग्गज नेत्यांच्या मनोगतांचाही या अंकात समावेश आहे. त्याचबरोबर इतर जाणकारांच्या लेखांतून डॉ. चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख होणार आहे. लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाच्या दीर्घ परंपरेला साजेसा असा हा विशेषांक डॉ. चव्हाण यांच्या बहुमोल कर्तृत्वाची ओळख नव्या पिढीला नक्कीच करून देईल.
या विशेषांकाचे अंकाचे मुख्य संपादक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा माहितीपूर्ण अंक तयार करण्यात आला.