दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । सातारा। स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व दैनिक पुढारीने हाती घेतलेल्या दिव्यांगांच्या लसीकरणाचा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिव्यांगांच्या जवळच्या ठिकाणी जावून लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोन विशेष मोहिमचे आयोजन करुन लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या दिव्यांगांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा शुभारंभ आज स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, दै. पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, अमोल कारंडे आदी उपस्थित होते.
दिव्यांगांच्या सोयीसाठी त्यांच्या घराजवळ जावून लसीकरण करण्यात येणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये दुसरी लसही घ्यावी. लस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. दै. पुढारीने दिव्यांगांच्या लसीकरणासाठी सुरु केलेले काम स्तुत्य असून त्यांच्या उपक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.
कारोना संकटाच्या काळात दै. पुढारीने दिव्यांगांच्या लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. दिव्यांगांनी लस घेऊन दुसऱ्यालाही लस घेण्याचे आवाहन करावे. लस घेत्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. दैनिक पुढारीने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यानी आभार मानले.
दोन मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एक कार्यक्रम तयार करुन त्यांच्या घराजवळ लावून लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात दै. पुढारीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे केले. कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग उपस्थित होते.