स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता योजनेत पारदर्शकता यावी : रणजीत श्रीगोड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 30 जून 2021 । फलटण । एस.टी.प्रवासात अपघात होवून प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला मदत करता यावी या उद्देशाने सन 2016 साली बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र तत्कालीन अधिकार्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळून महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट या नावाने धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचेकडे नोंदणी करण्यात आली. या योजनेच्या घटनेत योजनेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासण्यात आला असून राज्यातील जनतेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्यावतीने अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एस.टी.बसमध्ये एखाद्या प्रवाशाचा अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला भरीव आर्थिक मदत करता यावी हा या योजनेचा उद्देश होता. त्यानुसार प्रत्येक प्रवाशाला प्रवास करताना तिकीटामागे 1 रुपये विशेष निधी आकारण्यात येऊ लागला व या योजनेत 167 कोटी रुपये निधीचे लक्ष केंद्रीत करण्यात आले. दरम्यान तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.चा कारभार मराठी भाषेतून सुरु करण्याचे आदेश दिले असताना तत्कालीन अधिकार्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत या योजनेतून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले. शिवाय या योजनेच्या घटनेमध्ये योजनेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता आणणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विश्‍वस्त मंडळाची घटना व नाव मराठी भाषेतून तयार करण्यात यावे. या विश्‍वस्त मंडळात राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व विभाग नियंत्रकांना सदस्यत्व द्यावे. राज्यातील सर्व आगारातून जमा होणारी रक्कम विश्‍वस्त मंडळाने जे बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेत जमा करण्यात यावेत. दर तीन महिन्यांनी कार्यकारी मंडळाची सभा घेऊन आढावा घ्यावा व मंजुरी घ्यावी. दरवर्षी वार्षिक जमाखर्च व ऑडिट रिपोर्टला वार्षिक सभेत मंजुरी घेऊन आगार स्तरावर जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात यावे. आदी मागण्यांचा समावेश सदर निवेदनात करण्यात आला असून निवेदनावर रणजीत श्रीगोड यांच्यासह महासंघाचे सचिव गुरुनाथ बहिरट, महासचिव नंदकुमार कोरे, उपाध्यक्ष अरुण वाघमारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!