दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । “सर्व भावनांचा, भाषेतील प्रत्येक शब्दांचा आशय सुरात प्रकट करणाऱ्या लता मंगेशकर या सहस्रकातील भारताला ईश्वराकडून मिळालेली मोठी देणगी आहे”, असे भावोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले.
विनीता तेलंग लिखित आणि हिंदुस्तान प्रकाशन अर्थात साप्ताहिक विवेकने प्रकाशित केलेल्या ‘रसमयी लता‘ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित समारंभास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर मंचावर उपस्थित होते.
मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, लेखिका विनीता तेलंग यांनी लता मंगेशकर यांचा हिमालयाची ऊंची असलेला जीवनपट मांडताना ती ऊंची कायम ठेवत, भाव कायम ठेवून अत्यंत उत्तम पद्धतीने मांडला आहे. साप्ताहिक विवेकने सतत समाजात जे जे काही चांगले आहे, उत्तम आहे त्यासाठी मार्गदर्शक व मध्यस्थाची जबाबदारी पार पाडली आहे.
विवेक असेल तरच समाज जगेल अशी पुष्टीदेखील मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी जोडली.
लता मंगेशकर या भारताची नव्हे तर जगाची शान होत्या, साक्षात सरस्वती असे वर्णन अतिशयोक्ति ठरणार नाही. लता मंगेशकर यांनी कष्टमय आयुष्य जगत असताना संकटातून आनंदाच्या महामार्गावर जाता येता ही शिकवण दिली. 36 भाषांत गाणे ही दैवी देणगी होती असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
हल्ली पुस्तक वाचणे कमी झाले आहे, ऐकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार आता ‘स्टोरीटेल‘ प्रमाणे पुस्तके तयार करायला हवी. यासाठी एखादी भारतीय कंपनी पुढे यावी असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
दिलीप करंबेळकर यांनी प्रास्ताविकात विवेक ची भूमिका स्पष्ट केली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि गायक श्रीधर फडके यांनीही मनोगत व्यक्त केले.