दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । खटाव । खटाव तालुक्यातील वेटणे गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान मंदार मानसिंग नलवडे वय 32 यांचा बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यांना रात्री उशिरा साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. जवान मंदार यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंदार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी वेटणेत जनसमुदाय लोटला होता.
वेटणे येथील मंदार नलवडे यांचे प्राथमिक शिक्षण वेटणेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. बुध येथील श्री नागनाथ विद्यामंदिरामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. मंदार 12 वर्षापूर्वी केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल जी.डी. पदावर नोकरीस रुजू झाले. गेली बरेच दिवस मुंबई येथील न्हावाशेवा बंदरावर ड्युटी करत होते. बुधवरी पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यावर संपूर्ण पंचक्रोशी व वेटणे गावावर शोककळा पसरली होती. काल दुपारपासून पार्थिव वेटणे येथे येणार असल्याने गर्दी जमायला सुरुवात झाली. रात्री उशिरा अकरा वाजता मंदार याचे पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबीय व आप्तेष्ठांनी हंबरडा फोडला. फुलांनी सजवलेल्या टॅक्टरमध्ये पार्थिव ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय लोटला होता. मंदार नलवडे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या. यानंतर वेटणे गावातून मिरवणूक मळ्यात त्यांच्या घराच्या दिशेने काढण्यात आली.
प्रशासनाकडून तहसिलदार किरण जमदाडे, पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी किशोर घनवट, आजी – माजी सैनिक संघटना, रि . कॅप्टन कृष्णा गुंजवटे, सरपंच सायली कोरडे, उपसरपंच महेश नलवडे, चेअरमन आनंदराव नलवडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिनेश देवकर, नितीन नलावडे, मनोज नलवडे, संभाजी नलवडे, संजय नलावडे, अमृत नलवडे, व सीआयएसएफच्या जवानांनी मंदार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्रे अर्पण केली.
सातारा पोलीस दलाच्या जवानांनी बिगुल वाजवून व बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंदार यांची पत्नी, लहान मुलगा, आई वडिल व लहान भाऊ यांनी अंत्यदर्शन घेतले. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर जवान मंदार यांच्या पार्थिवास वडिल मानसिंग यांनी अग्री दिला . त्यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला.