स्थैर्य, सातारा, दि. २९ : सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा सदैव दुष्काळाने ग्रासलेला पहावयास मिळत असतो. दुष्काळी तालुक्यात सर्वात प्रभावीपणे राबलेल्या जलसंधारण, पाणी आडवा पाणी जिरवा, पाणलोट, साखळी बंधारे याद्वारे माण तालुक्यात शासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, पाणी फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून पावसाळ्याआधी फार मोठी जलसाठ्याची निर्मितीची कामे माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने सध्या बहुतांश तलाव, बंधारे, विहिरी भरल्या आहेत.
सदैव कपाळावर कोरलेला दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणारी भटकंती अशी भयानक परिस्थिती दरवर्षी निर्माण होत होती. मात्र मागील पाच वर्षापासून पाणीसाठा जिवंत राहण्याबरोबर दुष्काळ हाटण्यासाठी वरदान ठरली ती म्हणेज प्रत्येक गावातील विविध माध्यमातून उभारण्यात आलेली जलसंधारणाची कामे. माण तालुक्यातील बहुतांशी तलाव, बंधारे, विहिरी , ओढ्यांना पावसाचे पाणी आले असून ते ओसंडून वाहताना दिसत आहे. मोठमोठ्या जलसाठ्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधार्यामुळे जलसंवर्धनाबरोबर जलसाठ्यात कमालीची वाढ झालेली पहावयास मिळत आहे तसेच वनसंपदा वाढविण्यासाठी वनखाते, विविध सामाजिक संस्था, फाऊंडेशन, युवा मंच, सहकारी संस्था यांनी डोंगरभागात वनसंवर्धन करण्यासाठी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याने डोंगरभागात हिरवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सन 2014 पासून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून दुष्काळ निवारण होण्यासाठी जलसंधारणाची कामे वरदायी ठरली आहेत. माण तालुक्यात काही भागात जलक्रांती घडली आहे. त्या ठिकाणचा परिसर हिरवागार झाला आहे. दुष्काळी कलंक पुसण्याचे काम हे केवळ जलसंधारण कामामुळे होईल. दुष्काळ निवारण करण्यासाठी जलसंधारणच वरदायी ठरले आहे.