
दैनिक स्थैर्य । 7 मे 2025। फलटण । विठ्ठलवाडी, पिलीव ता. माळशिरस येथे नीरा उजवा कालव्याला कि. मी. क्रमांक 139 वर 8 मोरी पुलाजवळ मंगळवार दि. 5 मे रोजी मोठे भगदाड पडले. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले, मात्र शेजारी असलेल्या ओढ्यातून पाणी वाहून गेल्याने जमिनीची धूप, पिकांचे नुकसान, राहत्या घरांचे मोठे नुकसान टळले आहे.
पिलीव, ता. माळशिरस येथील ब्रिटीश कालीन सन 1920 मध्ये बांधकाम झालेल्या नीरा उजवा कालवा 8 मोरी पुलाजवळील दक्षिणेकडील भिंतीचे दुरुस्ती काम सन 2007 – 2008 मध्ये करण्यात आले, मात्र त्यापैकी अपूर्ण बांधकाम पूर्ण केले नसल्याने सदर भिंतीला भगदाड पडले असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.
प्रारंभी पडलेली भळ बुजविण्याचा संबंधीत यंत्रणेने 2 दिवस आटोकाट प्रयत्न केले होते, सिमेंट, फिक्सीट व इतर साहित्य वापरुन भळ बुजविली होती, मात्र मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास सदरची भिंत पाण्याच्या दाबामुळे खचून कोसळल्याने लाखो लिटर पाणी ओढयात वाहून गेले. हेे पाणी झिंजेवस्ती मळोली, शेंडेचिंचपर्यत ओढयात वाहून गेले.
कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच नीरा उजवा कालवा विभागाच्या अधिकार्यांनी खुडुस येथील 77 चौकी व त्या वरील सर्व फाट्यांना पाणी सोडल्याने वाहणारे पाणी कमी झाले. 6 तासात पाणी बंद झाले. या कामाची युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात येणार असल्याचे वेळापुरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले. नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अधिकार्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबतची माहिती प्रांताधिकारी, तहसीलदार, संबंधीत गावचे तलाठी ग्रामसेवक यांना देण्यात आली आहे. ओढ्या लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हे काम येत्या 10- 12 दिवसात पूर्ण करुन सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणार्या शेतकर्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वेळापुरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले.
यावेळी पोलीस नाईक सतीश धुमाळ, अमित जाधव यांनी भेट देऊन परिसरातील ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) अमोल कांबळे, महसूल मंडल अधिकारी विजय एखतपुरे यांनी भेट देवून पाहणी केली.