स्थैर्य, कोरेगाव, दि. 27 : पाडळी स्टेशन – सातारारोड, ता. कोरेगाव येथील चतुरा दत्तात्रय फाळके (वय 66) यांना बांगड्याचे डिझाईन बघण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात पुरुषांनी सोन्याचे दागिने मागितले व त्यांना रद्दी पेपर आणण्यास सांगितले. फाळके या खोलीमध्ये पेपर आणण्यासाठी गेल्या असता हे दोघांनी पोबारा केल्याची घटना रविवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास चतुरा फाळके या पाडळी गावातील घरातून निघून खिळा नावाचे शिवारात त्यांचे शेतात घरून गोटीचा माळ मार्गे पायी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावरील गोविंद दूध डेअरी समोरून सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जात असताना रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने दुचाकी मोटरसायकलवरून दोन इसम कोरेगावकडे निघाले होते. त्यांनी चतुरा फाळके यांचे जवळ गाडी थांबवली व पुढे गाडी चालवत असलेल्या इसमाने आजी बरे आहे का असे विचारले त्यावेळी आजींनी त्यांना मी तुम्हाला ओळखले नाही. तुम्ही कोण असे विचारल्यावर दुचाकीवर असलेल्या इसमाने मी भूषण साबळे शिवथरचा आहे. मी तुमच्या घरी येवून गेलो आहे असे म्हणाला. मोटरसायकलवर मागे बसलेल्या इसमाला तो म्हणाला, आजीला नमस्कार कर. भूषण म्हणाला, भावाचे लग्न ठरले आहे. आम्हाला सोन्याचे दागिने करण्यासाठी डिझाईन कसली करावी, बांगड्या कराव्या की पाटल्या असे विचारले. यावर चतुरा आजींनी त्यांना बांगड्या करा असे सांगितले. आम्ही पपईच्या कॅरेट घरी ठेवून येतो असे म्हणाले व निघून गेले. त्यानंतर चतुरा शेतात गेल्या. त्यानंतर पावणेअकराच्या सुमारास चतुरा शेतात खुरपत असताना ते दोघे पुन्हा मोटरसायकलवर आले व आजी मला तुमच्या बांगड्यांची डिझाईन दाखवा. आम्हाला गंठण देखील करायचे आहे असे म्हणाले. त्यावेळी चतुरा यांनी त्यांच्या पतीला फोन लावत असताना ते म्हणाले, आम्हाला बराच बाजार करायचा आहे. तुम्ही आमच्या गाडीवरून घरी चला असे म्हणून त्यांनी फोन लावू दिला नाही. त्यानंतर त्यांच्या मोटरसायकलवरून चतुरा फाळके व ते दोघे जण पपईचे कॅरेट घेवून चतुरा साबळे यांच्या घरी गेले. त्यानंतर चतुरा साबळे यांनी त्यांचेकडे असलेल्या गंठण व बांगड्या विश्वासाने दाखवल्या. चतुरा यांना रद्दी पेपर द्या म्हणाल्याने त्या आतील रूममध्ये गेल्या व पेपर घेवून आल्यानंतर पाहिले तर सदरचे इसम तेथे दिसले नाहीत. त्यांचे पपईचे कॅरेट तसेच होते. चतुरा यांनी बाहेर बघितले तर ते दोघे दिसून आले नाहीत. यामध्ये पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी मंगळसूत्र व एक लाख रु. किमतीचे, पन्नास ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या यांचा समावेश आहे. सदर घटनेची फिर्याद चतुरा दत्तात्रय फाळके यांनी सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात दिली असून पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरेगावचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करीत आहेत.