
स्थैर्य, सातारा, दि. 12 : लिंब, ता. जि. सातारा येथील एकाला दोन अज्ञातांनी चाकूच्या धाक दाखवत व दगडाने जबरी मारहाण करुन त्याचेकडील रोख रक्कम व मोबाईल असा 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना दि. 10 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लिंब हद्दीत ढगेवाडी फाटय़ाजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, आदिक मारुती राजे (वय 30) रा. लिंब, ता. जि. सातारा दि. 10 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरुन जात असताना दोन अज्ञात युवकांनी लिंब हद्दीत ढगेवाडी फाटय़ाजवळ त्यांना आडविले. राजे यांच्या गळ्याला चाकु लावून त्यांना एका शेतात नेले. त्याठिकाणी त्यांना दगडाने जबरी मारहाण करुन जखमी केले व त्यांच्याकडील 11 हजार रुपये रोख रक्कम व एक सात हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 18 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अदिक राजे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.