स्थैर्य, सातारा, दि.१३: येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणार्या जय हिंद फर्निचर ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शटरचा पत्रा उचकटून दोन अज्ञात महिलांनी 90 हजार 900 रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, निलेश भुपाल वाघमारे (वय 34, रा. चाहूर कॉलनी, कृष्णानगर, सातारा) यांचा फर्निवर शॉप व मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र स्कूटर कंपनीजवळ त्यांचे जय हिंद फर्निचर आणि मॅन्यूफॅक्चरिंग नावाची फर्म आहे. दि. 25 मे रोजी रात्री साडेआठ ते दि. 8 जून रोजी सायंकाळी साडेसहा या कालावधीत दोन अज्ञात महिलांनी कंपनीच्या पाठीमागे असणार्या बंद पत्र्याच्या शटरचा पत्रा उचकटून कुलूप तोडून आत प्रवेश केला. 32 हजार रुपये किमंतीचे चार हजार हँडल नग, 15 हजार रुपये किमंतीचे स्टेलनेस स्टीलचे ड्रावरचे एक हजार नग, सोफा बनविण्यासाठी लागणारी स्क्रू फिट करणारी 15 हजार रुपये किमंतीची मशिनरी, पंधराशे रुपयांची बिजागरी, 6 हजार रुपयांचे स्क्रू, 18 हजार रुपये किमंतीचे तीन हजार लॉक, 1400 रुपयांचे लोखंडी अँगल, दोन हजार रुपयांची बंद पडलेली मोटर असा 90 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता हे साहित्य दोन अनोळखी महिला घेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या घटनेनंतर निलेश वाघमारे यांनी याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.