दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | माण तालुक्यातील पानवण येथील घुने वस्तीवर अचानक घराला आग लागून अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सौ.पमाबाई शिवाजी शिंदे, यांच्या घराला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आग लागली. पमाबाई शिंदे यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून लोकवर्गणीतून साहित्य आणून छोटसं घर तयार केलेले. त्या झोपडीत गॅस सिलिंडर चा स्फोट होऊन संसार उद्ध्वस्त झाला. खोपटाला आग लागली आणि घरात काहीच शिल्लक राहिलं नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरूवार सकाळी ९ वाजणेच्या सुमारास अचानक छप्पराला आग लागली. या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असून संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे. जीवीत हाणी झाली नाही. गावकामगार तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या आगीत धान्य , कपडे व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. संबंधित अधिकारी यांनी त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.