दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । वाई । धोम (ता वाई) धरणाचा डावा कालव्याला खानापूर गावच्या हद्दीत पहाटे साडेतीन वाजता भगदाड पडल्याने लाखो क्यूसेक्स पाणी वाहून गेले. कालवा ओढड्यावर फुटल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टाळले. मात्र यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता तर ही दुर्घटना टळली असती असे ग्रामस्थांनी सांगितले.मागील दोन तीन दिवसांपासून कालव्यात साडेचारशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. कालवा फुटल्याचे कळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पहाटे चार वाजता कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.कालवा मार्गावरीक पाण्याचे मार्ग पटापट खुले केल्याने अधिकचा धोका टाळला.सकाळी घटनास्थळी कार्यकारी अभियंता अशोक पवार, उपअभियंता निलेश ठोंबरे, तांत्रिक अभियंता भास्कर साळुंखे यांनी भेट दिली.कालवा फुटलेल्या ठिकाणच्या दुरुस्तीचे काम लगेचच आज सुरु झाले आहे.यासाठीची यंत्रसामुग्री त्या ठिकाणी उतरविण्यात आली आहे.आठ दिवसात कालव्याचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.