“लाडकी बहीण” योजना योजना कधीही बंद होणार नाही : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 13 फेब्रुवारी 2025 | मुंबई | “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, असा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “या मागणीचा जरुर विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.


Back to top button
Don`t copy text!