
स्थैर्य, कोळकी, दि. २६ ऑगस्ट : कोळकी (ता. फलटण) येथे सुरू असलेल्या ‘जिंगो सर्कस’मध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करत, या सर्कशीच्या सर्व परवानग्या तपासण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोळकी येथील नागरिक धर्मराज देशपांडे आणि इतर अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षरी केलेले हे निवेदन उपविभागीय अधिकारी, फलटण यांच्या कार्यालयात सादर केले आहे.
या निवेदनावर धर्मराज देशपांडे यांच्यासह अभिमन्यू तानाजी निगडे, विपुल तनपुरे घोरपडे, कुणाल नवनाथ घोरपडे, प्रणव जीवन आठवले, विवेक विनायक राऊत, साहिल राजू पवार, प्रथमेश प्रकाश राठोड, सुरज विठ्ठल कोळे, रणजित नंदकुमार माने, साजन रामचंद्र पेटारे, गणेश साहेबराव कांबळे, पवार द… चव्हाण, सुरज वामनराव झोळ, ओम गौतमकुमार भोसले, अनिकेत कटार, अक्षय भाऊसाहेब काकडे, अक्षय राजेंद्र गायकवाड, ओंकार प्रशांत हजारे, ओमंग महादेव कदम, दिपक आप्पाराव राऊत, सागर शिवाजी जाधव, स्वप्निल मधुकर लोंढे, स्वप्निल जगदाळे, केदार सदाशिव गावसावी, वैभव विलास जाधव, करण लहु कांबळे, चैतन्य जाधवर, प्रतापसिंह संजय पवार, दर्शन भिमराव जाधव, अभिजित अनिल निंबाळकर, सुजय अजय पवार, गणेश पिसाळ, ॲड. बापु अप्पा काळे, सागर संतोष होळकर, मयुर चंद्रकांत पवार आणि अमोल महादेव वालिप आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
निवेदनानुसार, सर्कसच्या ठिकाणी आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन गाडी किंवा साधे अग्निरोधक सिलेंडरही उपलब्ध नाहीत. तसेच, एखादा अपघात किंवा इजा झाल्यास तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेची (ॲम्बुलन्स) सोय देखील नाही. कायद्यानुसार, कोणत्याही मोठ्या मनोरंजनाच्या किंवा गर्दीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक आहे, असे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
या सर्कसने पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि स्थानिक कोळकी ग्रामपंचायत यांच्याकडून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का आणि त्यातील अटी-शर्तींचे पालन होत आहे का, याची सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर सर्कस मालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल, तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

