कुसुंबी घाटात फुफाट्यातून प्रवास; रस्त्यावरील मातीमुळे अपघाताचा धोका


जावळी तालुक्यातील पाचवड-मेढा-खेड या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू असल्याने कुसुंबी घाटात मोठ्या प्रमाणात धूळ आणि फुफाटा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

स्थैर्य, मेढा, दि. २९ मार्च : जावळी तालुक्यातून जाणाऱ्या पाचवड-मेढा ते कुसुंबीमार्गे खेडला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, मेढा ते सह्याद्रीनगरदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम केल्यामुळे कुसुंबी ते कोळघर घाटात मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग साचले आहेत. यामुळे वाहनचालकांना लाल फुफाट्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

मोऱ्यांच्या ठिकाणी वाहने घसरण्याची शक्यता

ज्या ठिकाणी नवीन मोऱ्यांचे बांधकाम सुरू आहे, तेथे रस्ता खोदल्याने प्रचंड मातीचे ढीग तयार झाले आहेत. या मातीच्या ढिगाऱ्यांतून दुचाकी चालवणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडून वाहने घसरत असल्याने येथे मुरूम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी होत आहे.

पाणी मारण्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष

शासनाकडून या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सुरू असले तरी, ठेकेदाराकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. पाणी मारण्यासाठी टँकर उपलब्ध असले तरी ते दिवसातून किती वेळा पाणी मारतात, हा प्रश्नच आहे. एखादे वाहन वेगाने गेल्यास धुळीचे लोट उडून मागील चालकांना रस्ता दिसेनासा होत आहे.

नागरिकांना श्वसनाचा त्रास

धुळीमुळे दुचाकीचालक, प्रवासी, पादचारी आणि शेतकऱ्यांचे कपडे माखत आहेत. अनेक नागरिकांना धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचे विकार जडत आहेत. तसेच, रस्त्यालगतच्या घरांवर आणि व्यावसायिक ठिकाणीही मातीचे थर साचत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्याच्या वेगाने धूळ सर्वत्र पसरत आहे.

सुरक्षिततेची काळजी घेण्याची मागणी

रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर बारीक खडी मोठ्या प्रमाणावर विखुरली आहे. यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित ठेकेदाराने दररोज रस्त्यावर पाण्याचा मारा करावा आणि वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!