
दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
कुरवली बु., ता. फलटण गावच्या हद्दीत शेतावर आपल्या पतीची लागलेली भांडणे सोडविण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कुरवली बु. गावच्या हद्दीत जमीन गट नं. १९१ मधील शेतात फिर्यादीचे पती यांना गावातीलच जालिंदर बंडोबा कदम हा ‘तू रस्त्यात का उभा राहिला आहे’, असे म्हणून हाताने मारहाण करत होता. ती भांडणे सोडविण्यास गेले असता जालिंदर कदम याने माझा उजवा हात धरून माझ्या पाठीत मारले व माझ्या डोक्यावरील पदर ओढून फाडून माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जालिंदर कदम याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ह. साबळे करत आहेत.