स्थैर्य, कोरेगाव, दि.१७: कुमठे ता. कोरेगाव येथे स्वर्गीय श्रीधर अरलूलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुमठे ग्रामपंचायत, कोरेगाव पंचायत समिती व कुमठे ग्रामस्थांच्यावतीने मुरलीधर मंडपामध्ये ऑक्सीजन बेड युक्त चार बेडची सुविधा असलेले कोरोना केअर सेंटर कुमठेकरांच्या सेवेत रुजू झालेले आहे. कुमठेकरांच्या आरोग्यासाठी आपण कायम तत्पर राहू असे आश्वासन कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी यावेळी दिले.
कुमठे ता. कोरेगाव येथील मुरलीधर मंडपामध्ये करण्यात आलेल्या कोरूना केअर सेंटरचा उद्घाटनाप्रसंगी कुमठे पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुरलीधर मंडप येथे साकारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरसाठी डॉ. राजीव अरलूलकर हे कोरोना रुग्णांसाठी सेवा देणार असल्याने त्यांचाही यथोचित सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
कुमठे गावातील जेष्ठ समाजसेवक, आचार्य विनोबा भावे यांचे अनुयायी, जिल्ह्यातील पहिले राष्ट्रीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त स्व. श्रीधर सखाराम अरलूलकर उर्फ मास्तर मामा यांच्या वार्षिक कृतज्ञता दिनानिमित्त अरलूलकर कुटुंबीयांनी कोरोना केअर सेंटर साठी दिलेल्या श्री मुरलीधर मंडप येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजीव अरलूलकर व राजीव जवळेकर यांचे व अरलूलकर कुटुंबीयांचे आभार मानत आगामी काळात श्रीधर अरलूलकर यांच्या नावाने कृषी पुरस्कार जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही जगदाळे यांनी स्पष्ट केले.