सकल जैन समाज, लोणंदच्या वतीने वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेविका झालेल्या कु. सिद्धाली शहा यांचा गौरव; भव्य पालखी अन् रक्तदान शिबिराचेही आयोजन


स्थैर्य, लोणंद, दि. २९ मार्च : लोणंद (ता. खंडाळा) येथील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदिरात सोमवार, दि. ३० मार्च रोजी भगवान महावीर जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. श्री चिन्मया श्री माताजी (ब्र. डॉली दीदी) यांच्या पावन सानिध्यात होणाऱ्या या मंगलमयी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे, फलटणच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा सकल जैन समाजाच्या वतीने होणारा विशेष सत्कार.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येण्याची किमया साधणाऱ्या आणि अल्पावधीतच आपल्या प्रभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कु. सिद्धाली शहा यांच्या या कार्याची दखल घेत सायंकाळी ६ ते ७ या वेळेत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

याच सोहळ्यात कु. सिद्धाली शहा यांच्यासोबतच लोणंदकरांच्या वैद्यकीय सेवेत नव्याने रुजू झालेले नूतन डॉक्टर्स – डॉ. साहिल (नातू डॉ. आर. पी. गांधी), डॉ. सागर (नातू डॉ. अभय वर्धमाने) आणि डॉ. पल्लवी सागर वर्धमाने यांचाही समाजाच्या वतीने विशेष सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल:

जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक ७ वाजता भक्ती भरत शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर सकाळी ७:३० वाजता श्री अभिषेक आणि ८ ते ९ या वेळेत श्री चिन्मया श्री माताजींच्या उपस्थितीत शहरातून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत नीरा रोडवरील ‘साई हॉस्पिटल’ येथे एका भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी ११ वाजता महावीर मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याचे दाते ‘पूजा कलेक्शन’चे श्री महावीर नेमचंद शहा हे आहेत. तसेच, सायंकाळी ५ वाजता कोमल समीर शहा यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ मंदिरचे अध्यक्ष राजकुमार व्होरा, श्री महावीर मंदिरचे अध्यक्ष अशोक शेठ शहा आणि सकल जैन समाज लोणंद विशेष परिश्रम घेत आहेत. तरी या सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये जैन धर्मीयांसह परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!