अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत समिती सदस्यपदी क्षमा जोशी, किरण साबळे यांची निवड


स्थैर्य, सातारा, दि.15 ऑक्टोबर : सातार्‍यात जानेवारी 2026 मध्ये होणार्‍या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरु आहे. या संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी क्षमा जोशी, किरण साबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सहीने देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यविश्वातील सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतासह जगाच्या कानाकोपर्‍यातून साहित्यिक, कवी, समीक्षक, लेखक, साहित्यप्रेमी आणि मराठी संस्कृतीचे जतन करणारे मान्यवर एकत्र येतात. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या समितीत स्थान मिळणे ही प्रतिष्ठेची बाब असून मराठी साहित्यसेवेचा सन्मान मानला जातो. सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर होणार्‍या संमेलनाची तयारी, नियोजन सुरु असून स्वागत समितीमध्ये विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात येत आहे. क्षमा भालचंद्र जोशी यांचा जन्म मुंबई येथे झाला असून मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केले आहे. सातार्‍यात आल्यानंतर त्या जोशीजंपाला इंजिनियरिंग प्रा. लि. या घरच्या व्यवसायामध्ये मनुष्यबळ विकास विकास विभागात कार्यरत आहेत. पीएन जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या मॅनेजिंग ट्रस्टी असून या माध्यमातून होतकरू, शाळकरी आणि व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली आहे. ब्लड बँक, अनाथाश्रम, इतर सामाजिक उपक्रमांना त्या आर्थिक व वैयक्तिक सहभागातून मदत करत असतात. त्यांना चित्रकला, वाचन, भरतनाट्यम, शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची आवड आहे.

गोडोली येथील किरण बाळकृष्ण साबळे यांचा स्वामी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस हा व्यवसाय आहे. शेतकरी हा दुग्धव्यवसायाचा दैवत असून या व्यवसायिक दैवतासाठी कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये सर्व काही ठप्प असताना त्यांना दुधाचे बिल न थकता वेळेवर दिले. या व्यवसायिक बांधिलकीसोबत सामाजिक जाणीवेतून त्यांनी शेतकर्‍यांसाठी विविध वस्तूंचा पुरवठा केला आहे. जन्मभूमी, कर्मभूमी शिवथर येथील शाळेला तसेच विविध सामाजिक कामासाठी मदत केली आहे. त्यांनी अडचणीच्या वेळी जोडलेल्या प्रत्येक घटकाला निस्वार्थ हेतूने मदत करत आहे. 1985 ते 1993 सार्वजनिक वाचनालय शिवथर येथे कार्यवाहक म्हणून कामकाज पाहिले. यामध्ये वाचकांकरता वेगवेगळ्या लेखकांची पुस्तक व ग्रंथ वाचना करत उपलब्ध करून दिले. गावातील लोकांना वाचनाकरता प्रोत्साहन दिले.

सातार्‍यात होणारे साहित्य संमेलन हे वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि संयोजन समिती प्रयत्नशील असून त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार क्षमा जोशी आणि किरण साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल दोघांनीही आनंद व्यक्त केला असून संमेलनाच्या नियोजात देईल ते काम, जबाबदारी योग्यरितीने पार पाडण्याची ग्वाही दिली आहे. या दोघांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!