
फलटणमध्ये उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयाचे संयुक्त कृषी विज्ञान प्रदर्शन उत्साहात. आधुनिक शेती, ड्रोन, हायड्रोपोनिक्स, AI तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके.
स्थैर्य, फलटण, दि. 21 फेब्रुवारी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृहात कृषी विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक शाश्वत व नफादायक करण्याची गरज अधोरेखित केली.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृषीतील विविध अत्याधुनिक संकल्पना सादर केल्या. यामध्ये –
- सेंद्रिय व नैसर्गिक शेती
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व रोबोटिक्स शेती
- पॉलीहाऊस व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
- ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणी
- हवामान आधारित शेती व भविष्यातील पीक नियोजन
- सूक्ष्म सिंचन पद्धती
- पिक काढणी व पश्चात काढणी यंत्रसामग्री
- मुक्त संचार गोठा पद्धत
- शेती तंत्रज्ञान मोबाईल ॲप्स व बाजारभाव विश्लेषण
अशा विविध विषयांवरील मॉडेल्स, माहितीफलक व संशोधनाधारित प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रा. एस. आर. कश्यप व कृषि वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. ए. एस. रासकर यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नेतृत्व केले. विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने सादर केलेल्या मॉडेल्समुळे कृषी संशोधनाबाबतची आवड वाढीस लागल्याचे दिसून आले.
या प्रदर्शनामुळे शेतकरी, लघुउद्योजक व नागरिकांना आधुनिक शेतीविषयक माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. परिसरातील शेतकरी, कृषि निविष्ठा विक्रेते, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
फलटणमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची दिशा दाखवणारे हे प्रदर्शन कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

