कृष्णा विद्यापीठातर्फे कराडला 21 रोजी मॅरेथॉन स्पर्धा


स्थैर्य, सातारा, दि. 8 डिसेंबर : सहकारमहर्षी (कै.) जयवंतराव भोसले यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे ’कृष्णा मॅरेथॉन 2025’ या आरोग्यदायी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन 21 डिसेंबरला पहाटे साडेपाच वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून सुरू होणार आहे.

अप्पासाहेबांच्या जयंतीचेऔचित्य साधत त्यांच्या सामाजिक कार्याला आणि लोकाभिमुख विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. या मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर असे दोन गट असून, नोंदणीसाठी प्रत्येकी 320 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. सहभागींसाठी वयोगटानुसार स्वतंत्र श्रेणी निर्माण करण्यात आल्या असून, 18 वर्षांखालील, तसेच 19 ते 35, 36 ते 45, 46 ते 55 आणि 56 वर्षांपुढील अशा पाच वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

उत्तम धावपटूंना स्पर्धेचा अनुभव मिळावा, यासाठी कृष्णा विद्यापीठामार्फत प्रत्येक स्पर्धकालापदक, मॅरेथॉन बिब, टी-शर्ट, फिजिओथेरपी सपोर्ट, वैद्यकीय मदत, नाश्ता, तसेच प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉइंट्स अशा सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शर्यत पूर्ण करणार्‍या सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी मार्ग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांचे जाळे आणि वैद्यकीय यंत्रणा यांचीही काटेकोर तयारी केली जात आहे.

कृष्णा मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्याकडे वाटचाल करण्याचा आणि समाजमनात सकारात्मकता रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 14 डिसेंबरअखेर ओंकार ढेरे (मोबाईल 9075225653) अथवा अभिजित रैनाक (मोबाईल 9766710097) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!