कृष्णा पवारची राष्ट्रीय स्पर्धांत पाच पदकांवर मोहर

ग्वाल्हेर येथील दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्रात निवड


स्थैर्य, सातारा, दि. 11 सप्टेंबर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर गेल्या दीड वर्षापासून थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारांचा अथक सराव करून दोन राष्ट्रीय खुल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदके प्राप्त करणारी अंध विद्यार्थिनी कृष्णा प्रमोद पवार हिची नुकतीच ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील अटलबिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्रात निवड झाली आहे.

कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेत तसेच राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथील टॅक्सीचालक प्रमोद पवार यांची कन्या सिद्धी हिने दोन वर्षांपूर्वी येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी व राष्ट्रीय छात्र सेनेत प्रवेश घेतला. घरची परिस्थिती अगदी जेमतेम असल्याने ती येथे एक खोली भाड्याने घेऊन राहात होती. तिच्या सोबत तिची आई व इयत्ता नववीत असलेली अंघ लहान बहीण कृष्णाही राहात होती. कृष्णा अंघ असल्यामुळे तिला घरी शिकविले जात असे. अगदी लहानापासूनच तिला अ‍ॅथलेटिक्स खेळांची आवड होती. त्यामुळे तिने आपली बहीण सिद्धीच्या कॉलेजच्या मैदानावर जाऊन अ‍ॅथलेटिक्स खेळांचा सराव करण्याचे ठरवले. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनीही तिला सोयीसुविधा मोफत पुरविण्याच्या सूचना क्रीडा विभागाला केल्या. त्यानंतर कृष्णाने डॉ. अक्रम मुजावर, कॉलेजचे क्रीडा व राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण भोसले, प्रा. सनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या मैदानावर थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारांचा सलग वर्षभर कसून तंत्रशुद्ध सराव सुरू केला.

दरम्यान, बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खुल्या पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमधील थाळीफेक व गोळाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांत कृष्णा पवारने सहभाग घेत दोन सुवर्णपदके मिळवली. त्यानंतर ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील थाळीफेक, गोळाफेक व भालाफेक या तिन्ही प्रकारांमध्ये तब्बल तीन सुवर्णपदके पटकावली. या उज्ज्वल यशाच्या जोरावर नुकतीच तिची केंद्र सरकारच्या ग्वाल्हेर येथील अटलबिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष कालावधीच्या निवासी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे

भविष्यात माझे पॅरालिंपिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये उतरून देशासाठी सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न असून, हे स्वप्न मी अथक सराव करून व आई-वडील, सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने निश्चित साकार करेन.
– कृष्णा प्रमोद पवार.


Back to top button
Don`t copy text!