स्थैर्य, कराड, दि. 19 : आत्मनिर्भर बनू पाहणार्या महिला लघुउद्योजिकांना तसेच बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय-उद्योग उभारण्याची इच्छा असणार्या महिलांना कृष्णा महिला पतसंस्थेच्या माध्यमातून भरीव आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
येथील कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या साकुर्डी, ता. कराड शाखेचे उद्घाटन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृष्णा महिला पतसंस्था कार्यरत आहे. सध्याच्या या कोरोना संकटाच्या काळातही महिलांनी गृहउद्योगाच्या माध्यमातून स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक आधार प्राप्त करून दिला आहे. आज अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्कचे उत्पादन घेत आहेत. अशाप्रकारे आत्मनिर्भर बनू पाहणार्या महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कृष्णा महिला पतसंस्था सदैव तत्पर असेल.
याप्रसंगी पतसंस्थेच्या चेअरमन अलका अरुण जाधव, व्हाईस चेअरमन सरिता धनंजय पाटील, व्यवस्थापक नितीन देसाई, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, व्यवस्थापक अरुण यादव, धनाजी नायकल, बाळासाहेब थोरात, किसन थोरात, सुजित माने यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.