दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । फलटण । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून चौधरवाडी या गावचे ग्रामस्थ तुकाराम नामदेव कोकाटे यांनी सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार मंचाची स्थापना पाच वर्षांपूर्वी केली. अत्यंत संघर्ष व मेहनतीतून सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार मंच उभा राहिला. या विचार मंचाचे अध्यक्ष कोकाटे, उपाध्यक्ष भोसले, सचिव बनसोडे, खजिनदार डोंगरे आहेत.
या विचार मंचामध्ये एकूण 150 सदस्य आहेत. या विचार मंचाद्वारे अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत गावातील महिलांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास मुलांसाठी स्पर्धा परीक्षा जसे की शिष्यवृत्ती व इतर परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. तसेच मुलांना अभ्यासासोबत खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रशिक्षण दिले जाते. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्या प्रतिक्षा कट्टे, प्रीती लोंढे, ज्योती नाईक, चांदणी निकम, प्राजक्ता नाळे, अक्षदा खरात, ऋतुजा निगडे यांनी विचार मंचाला भेट देऊन काही सदस्य व विद्यार्थ्यांसोबत मिळून श्रमदान केले व त्यांच्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.