स्थैर्य, फलटण दि.११ : ब्रिटीश राजवटीत सन 1907 मध्ये सुरु झालेल्या, महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात नावलौकिक मिळविलेल्या कृषी महाविद्यालय, पुणेच्या माजी विद्यार्थी संघटना सर्वसाधारण सभेत आगामी 3 वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी कृषी महाविद्यालय पुणेचे निवृत्त प्राचार्य बी. के. जगताप (पणदरे, ता. बारामती) यांची निवड करण्यात आली आहे, तर फलटणचे प्रगतशील शेतकरी सुरेश उर्फ बाळासाहेब भोंगळे यांचा संचालक मंडळात पाचव्यांदा समावेश करण्यात आला आहे.
कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणेच्या इमारतीमध्ये संघटनेचे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय असून महाविद्यालयाच्या आवारात विविध उपक्रम राबविणेसाठी म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने या संघटनेस जागा उपलब्ध करुन दिली आहे.
कृषी महाविद्यालय, पुणे येथे शिक्षण घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासन, पोलीस, महसूल सह महाराष्ट्र शासनातील विविध खात्यामध्ये महत्वाच्या प्रशासकीय पदावर उत्कृष्ट काम करुन वेगळा लौकिक प्राप्त केला असून आजही तो कायम आहे. या संघटनेचे अनेक सदस्य देश विदेशातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मगाराष्ट्र राज्य विधानसभा व विधान परिषदेत या संघटनेचे 11 सदस्य विद्यमान आमदार आहेत, यापूर्वी राज्य मंत्रीमंडळात या संघटनेच्या सदस्यांनी उत्तम काम केले आहे.
संघटनेच्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष बी. के. जगताप, उपाध्यक्ष शेखर गायकवाड (विद्यमान साखर आयुक्त) आणि सर्जेराव जेधे देशमुख (मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे माजी मानद सचिव), सचिव डॉ. जे. आर. कदम (निवृत्त प्राध्यापक) आणि डॉ. सुरेश पवार (निवृत्त ऊस विशेषज्ञ). संचालक सुरेश खोपडे (निवृत्त आयपीएस), डॉ. एस. डी. माशाळकर (प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पुणे), रंगनाथ नाईकडे (निवृत्त आयपीएस), चंद्रकांत दळवी (निवृत्त आयएएस), डॉ. आर. एन. साबळे (हवामान तज्ञ), महेश झगडे (निवृत्त आयएएस), सुरेश उर्फ बाळासाहेब भोंगळे (प्रगतशील शेतकरी), दिलीपसिंह यादव (बांधकाम व्यवसाईक), हणमंत मोहिते (दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील उद्योजक), सल्लागार संचालक आ. अशोक पवार, आ. जी. डी. लाड, माजी कुलगुरु शंकरराव मगर, माजी अध्यक्ष गोकुळ दूध संघ अरुण नरके यांचा समावेश करण्यात आला आहे.
संघटना संचालक मंडळावर निवड झालेले सुरेश उर्फ बाळासाहेब भोंगळे हे अलगुडेवाडी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील असून सन 1978 मध्ये बी.एस्सी. (कृषी) आणि सन 1980 मध्ये एम. बी. ए. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या असून राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख या पदावर उत्तम काम केले आहे. सन 1999 आणि 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांची अनुक्रमे इस्त्राईल व युरोपीय देशातील अभ्यास दौर्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गटात निवड केली होती.
सध्या स्वतःचे शेतीमध्ये फळबाग आणि ऊस शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचे विविध प्रकल्प राबवीत आहेत. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून पदाधिकारी म्हणून कार्यरत असून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्र असलेल्या लायन्स संघटनेच्या 3234 डी 1 या प्रांताच्या रिजन 2 चे रिजन चेअरमन असून नुकत्याच झालेल्या प्रांतीय परिषदेत (वरील जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या) आणि बहुप्रांतीय परिषदेत(मुंबई आणि रायगड जिल्हे वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र) त्यांना उत्कृष्ट रिजन चेअरमन पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
सुरेश उर्फ बाळासाहेब भोंगळे यांची संघटना संचालक पदावर सलग पाचव्यांदा निवड झाली असून या निवडी बद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.