दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत हिंगणगाव येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त ‘कृषी दिंडी आणि जीवामृत प्रकिया’ कार्यक्रम घेतला.
यावेळी शाळकरी मुलांची शेतकरी वेशभूषा करून फेरी काढण्यात आली. फेरीदरम्यान कृषी दिनाचे व वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आले. ‘जय जवान जय किसान’ या गजरात सर्व गाव दुमदुमला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक कुलदीप नेवसे यांनी कृषीदिन केव्हापासून साजरा केला जातो व यामागचा इतिहास सांगितला.
ते म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांनी ‘पहिला शेतकरी मुख्यमंत्री’ होण्याचा मान पटकावला व अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. यामध्ये पंचायत राज, रोजगार हमी यासारख्या योजनांचा समावेश होतो. हे सर्व लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा केला जातो. शेतकर्यांना जीवामृताचे फायदे पटवून दिले व कृषीकन्यांनी जीवामृताचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जीवामृतामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते व कीड आणि रोगांना पिकापासून दूर करण्याची प्रतिकारशक्ति उत्पन्न होते इ. माहिती दिली. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी कृषी दिनाविषयी व शेतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ. दीपिका भोईटे, माजी सरपंच हेमा भोईटे, तलाठी नागरवाड, कृषी सहाय्यक नेवसे, कृषी पर्यवेक्षक पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंदे, लाळगे व सौ. पंडित मॅडम आदी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. प्रतीक्षा लोणकर, साक्षी अभंग, शारदा बोराटे, भाग्यश्री बोडके, मयुरी सावंत, संजना वाघमारे, अनुजा नाळे, अर्पिता पावणे यांनी कार्यक्रम पार पाडला.