क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि देशाच्या जडणघडणीसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार


स्थैर्य, मुंबई, दि. ३ : संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’ होते. महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीतील सहभागापासून ‘प्रतिसरकार’ आंदोलनापर्यंत त्यांनी दिलेला लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. हे इंग्रज सरकारविरोधातलं फार मोठं धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिलं. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासह देशाच्या जडणघडतीत दिलेल्या योगदानामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात कायम वरचं असेल व ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना आदरांजली वाहिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!