फलटणमधील क्रांतीसिंह नाना पाटील चौक कोंडीच्या विळख्यात; उपाययोजना न केल्यास जनआंदोलनाचा इशारा


स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण शहरातील प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. या चौकात सातत्याने होणाऱ्या कोंडीमुळे तासनतास वाहने अडकून पडत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील चौक हा फलटण शहराचा मुख्य चौक असून, पुणे, सांगली, सातारा, बारामती, अकलूज, नातेपुते या प्रमुख शहरांकडे जाणारी वाहने याच चौकातून जातात. तसेच पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, शिखरशिंगणापूर, गोंदवले आणि म्हसवड या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांची वाहनेही याच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे हा चौक सतत गजबजलेला असतो.

याच चौकालगत फलटण बस स्थानक असून, दिवसभरात एसटी बसच्या सुमारे ७०० ते ८०० फेऱ्या या चौकातून होतात. यशवंतराव चव्हाण हायस्कूलसह इतर शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, तसेच बारामती व फलटण एमआयडीसीमधील कामगारांच्या बसेसची वाहतूकही येथूनच चालते. यामुळे विद्यार्थ्यांची आणि कामगारांची दिवसभर मोठी वर्दळ या चौकात असते.

सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. सुमारे आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक डबल ट्रेलर ट्रॅक्टरद्वारे याच चौकातून केली जाते. त्याचबरोबर मोठमोठे कंटेनर आणि अवजड वाहतूकही सतत सुरू असते, याचा मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

या सातत्यपूर्ण कोंडीमुळे नाना पाटील चौक ते बारामती पुल, अहिल्यादेवी चौक आणि श्रीराम साखर कारखाना जवळील खाडखिरा ओढ्यापर्यंत दररोज दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. काही वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याने लहान-मोठे अपघात आणि वाहनचालकांमध्ये कुरबुरी होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. या कोंडीचा परिणाम व्यापारी पेठेवरही होत आहे.

या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवण्यासाठी रिंग रोड तयार करणे, चौकात सिग्नल यंत्रणा बसवणे, कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे. तसेच, बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करणे, खराब रस्त्यांची दुरुस्त करणे, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे आणि परिसरात पार्किंगची व्यवस्था करणे यांसारख्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी फुले यांनी केली आहे.

प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दशरथ फुले यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि फलटण पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!