आंदोलनाची दखल न घेतल्यास दिल्लीत ‘क्रांती’ मोर्चा ; मराठा समाजाचा इशारा


 

स्थैर्य, नाशिक, दि.२८: भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये झाली. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यात आली. येत्या २ ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय मराठा समाजाला इडब्लूएसमध्ये आरक्षण नको, या लक्षवेधी ठरावासह २५ महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्त्व करावे, असा विनंती करण्यात आली आहे.

मी मराठा समाजाचा सेवक : संभाजीराजे

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचे मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार, असे संभाजीराजे म्हणाले.

राज्यभरातील सर्व आमदार खासदार यांच्या घरासमोर २ ऑक्टोबरला धरणे आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान राज्यात विभागानुसार सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!