दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । पाँडिचेरीचे माजी नायब राज्यपाल दिवंगत नेते के.आर. मलकानी हे विलक्षण प्रतिभा लाभलेले प्रखर राष्ट्रवादी पत्रकार होते. अनेक उत्तमोत्तम पत्रकार व स्तंभलेखकांना सोबत घेऊन ऑर्गनायझर हे वृत्तपत्र त्यांनी घरोघरी पोहोचविले व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. दिवंगत मलकानी यांनी आपले संपूर्ण जीवन मातृभूमीसाठी समर्पित केले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
के आर मलकानी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेच्या वतीने राजभवन येथे मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सिंधी व उर्दू भाषा विकास परिषदेचे निदेशक डॉ. अकील अहमद, आमदार आशिष शेलार, रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ.सतीश मोध, सहयोग फाउंडेशचे अध्यक्ष डॉ.राम जव्हारानी व कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ.अजित मन्याल उपस्थित होते.
के आर मलकानी यांचा आपला घनिष्ट परिचय होता. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. हिंदुस्तान टाइम्सचे ते प्रतिनिधी होते. सिंधी संस्कृती व भाषेविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम होते. सिंधी भाषेला मोठा इतिहास आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. अशा वेळी सिंधी भाषा जतन करण्यासाठी सर्वांनी संकल्प केल्यास त्याला निश्चितच यश येईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
सिंधी भाषा जतन केली तर सिंधी संस्कृतीचे जतन होईल, असे आशिष शेलार यांनी सांगितले. सिंधी अकादमी स्वायत्त केली जावी व तिचे अनुदान वाढविले जावे, अशी अपेक्षा डॉ.अकील अहमद यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ.राम जव्हारानी व अरुणा जेठवाणी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सिंधी समाजातील मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हैद्राबाद सिंध शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष किशू मनसुखानी, के सी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.हेमलता बागला व सामाजिक कार्यकर्ते नानिक रूपानी यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.